दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवण्याची धमकी   

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उद्योग भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल अवजड उद्योग मंत्रालयाच्या सचिवांना शुक्रवारी मिळाला. त्यानंतर, एकच खळबळ उडाली. दरम्यान, ई-मेल खोटा असल्याचे दिल्ली अग्निशमन दलाच्या एका अधिकार्‍याने सांगितले. 
 
केंद्रीय सचिवालयाजवळील इमारतीत म्हणजे उद्योग भवनात अनेक केंद्रीय विभाग आहेत. उद्योग भवन आयईडीने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल दुपारी १ च्या सुमारास प्राप्त झाला. त्यानंतर, सुरक्षा अधिकार्‍यांना सर्व परिसर दुपारी तीनपर्यंत रिकामा केला. यादरम्यान, अग्निशमन दलाचे तसेच बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक तेथे दाखल झाले. सायंकाळी पाचपर्यंत उद्योग भवनाची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर, बॉम्बची धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाले. यादरम्यान, उद्योग भवनात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी परिसरातील सर्व वाहनांची कसून तपासणी करत होते. तसेच, उद्योग भवन परिसरातील नागरिकांचीही कसून चौकशी करण्यात आली.

Related Articles